Wednesday, 12 March 2014

मुख्यमंत्री-काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली गारपीटग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे आणि पूनर्वसन मंत्री श्री पतंगराव कदम यांनी दि. 11 मार्च 2014 रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली व नुकसानाचा आढावा घेतला.
या दौ-यामध्ये त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी व कनबस येथे नुकसान झालेली द्राक्ष, केळी व पपईची बाग, तसेच गहू, हरबरा व ज्वारीच्या शेतावर जाऊन शेतक-यांच्या हानीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्री श्री चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री ठाकरे आणि पूनर्वसन मंत्री श्री कदम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील भातंब्री येथे पपई बाग, गहू, हरबरा, ज्वारीचे पीक आणि वादळामुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी केली. तीनही नेत्यांनी मंगरूळ येथे ग्रामस्थांशी चर्चा केली व मदतीसंदर्भात त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
या नेत्यांनी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील लामजाना येथे द्राक्षबाग व इतर पिकांची पाहणी करून शेतक-यांच्या नुकसानाचा आढावा घेतला. किल्लारी येथे शेतकरी व नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. पीडितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे नैसर्गिक संकट मोठे असले तरी शेतक-यांनी चिंता करू नये; महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करेल, या आश्वासक शब्दात धीर दिला.
सायंकाळी त्यांनी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील आन्वीचा दौरा केला. या ठिकाणी त्यांनी मोसंबी बाग, कांदा, गहू, ज्वारी व इतर पिकांची पाहणी केली. याठिकाणी देखील मुख्यमंत्र्यांनी गावक-यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची माहिती घेतली.







No comments:

Post a Comment