Friday, 10 October 2014

भारताच्या प्रगतीबाबत काँग्रेसला विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही!


















काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांचे भाजपवर टीकास्त्र
कोल्हापूर व औरंगाबादेत विशाल सभा, वातावरण काँग्रेसमय
श्री राहुलजी गांधी शुक्रवारी दिंडोरी व पुरंदरच्या प्रचार दौ-यावर
मुंबई, दि. 9 ऑक्टोबर 2014:
पंडित नेहरूंनी भारताच्या प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विचारणा-यांचा जन्म देखील झालेला नव्हता. स्वातंत्र्यानंतर 67 वर्षात देश चंद्रावर, मंगळावर पोहोचला आहे. जगातील एक मोठी आण्विक शक्ती बनला आहे. हा विकास तमाम भारतीयांच्या कठोर परिश्रमांनी घडला आहे. त्यामध्ये काँग्रेसनेही महत्वाची भूमिका बजावली. भारताची प्रगती आणि त्यासाठी काँग्रेसने दिलेल्या योगदानाबाबत काँग्रेसला विरोधकांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे टीकास्त्र काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांनी सोडले आहे.
त्यांनी आज पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर येथे तर मराठवाड्यात औरंगाबाद येथे विशाल जाहीर सभांना संबोधित केले. दोन्ही सभांमध्ये भाषणाला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. महाराष्ट्र ही अनेक महात्म्यांची, समाज सुधारकांची, स्वातंत्र्यासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी बलिदान देणा-या असंख्य हुतात्म्यांची भूमी आहे, असे त्या म्हणाल्या.
भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका करताना श्रीमती सोनियाजी गांधी म्हणाल्या की, विकासाबाबत महाराष्ट्र नेहमीच गुजरातच्या समोर राहिला आहे. उद्योग, परकीय गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रणी आहे. देशाच्या विद्ममान पंतप्रधानांना कदाचित महाराष्ट्राने गुजरातवर घेतलेली ही आघाडी मान्य नसावी. त्यामुळेच ते भ्रामक प्रचार करीत आहेत.
काँग्रेसने मागील 60 वर्षात काय केले, असा प्रश्न पंतप्रधान सातत्याने उपस्थित करीत आहेत. पंडित नेहरूंनी भाक्रा-नांगल धरणाची पायाभरणी केली तेव्हा श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म देखील झालेला नव्हता. आधुनिक भारताचे स्वप्न आकार घेऊ लागले तेव्हा मोदी जेमतेम 5 वर्षांचे होते. इंदिरा गांधींनी देशाला अन्न-धान्याबाबत स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने हरित क्रांतीचे काम करायला सुरूवात केली तेव्हा मोदींचे वय फक्त 13 वर्षांचे होते. दुग्ध व्यवसायात श्वेत क्रांती झाली तेव्हा ते संघाच्या शाखेत जात होते. राजीव गांधींनी माहिती व तंत्रज्ञानातील क्रांतीसाठी काम सुरू केले तेव्हा याच मोदींचा भाजप काँग्रेसची खिल्ली उडवित होता. राजीवजींनी माहिती व तंत्रज्ञानाची क्रांती केली नसती तर सध्याच्या पंतप्रधानांना खोट्याचे खरे करून आपली प्रसिद्धी करणे शक्य झाले असते, असा खोचक प्रश्न काँग्रेस अध्यक्षांनी उपस्थित केला.  
स्वातंत्र्यानंतर भारताने विकासाच्या आघाडीवर निश्चितपणे मोठी कामगिरी केली आहे. 67 वर्षात भारताने मारलेली मजल एक तपस्याच आहे. त्यासाठी या देशातील जनतेने, शेतक-यांनी, कामगारांनी, सर्वच समाजघटकांनी घाम गाळला. रक्ताचे पाणी केले. अनेक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. विकास कधीही अचानक होत नसतो. एकट्याच्या बळावर देखील होत नसतो. त्यासाठी दीर्घ परिश्रम करावे लागतात आणि भारताच्या नागरिकांना ते केले आहेत, असे श्रीमती सोनियाजी गांधी पुढे म्हणाल्या.
भाजप-शिवसेनेवर टीका करताना त्या म्हणाल्या की, काल-परवापर्यंत एकत्र असलेले हे दोन्ही पक्ष आज सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांवर तीव्र हल्ले करीत आहेत. शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढत असले तरी त्यांची मानसिकता सारखीच आहे. दोघेही जनतेच्या भावनांना हात घालून लोकांची दिशाभूल करतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात श्री नरेंद्र मोदींनी शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे स्वप्न दाखवले होते. प्रत्यक्षात त्यांनी महागाईत प्रचंड भर घातली. त्याबद्दल प्रश्न विचारले की ते गप्प होतात. विद्ममान पंतप्रधान पाकिस्तानला धडा शिकविणार होते. आज त्यांना पाकिस्तानकडून सतत होणा-या गोळीबाराकडे बोलायलाही वेळ नाही, असेही श्रीमती सोनियाजी गांधी म्हणाल्या.  




No comments:

Post a Comment