काँग्रेसच्या दोन प्रचार पुस्तिकेंचे प्रकाशन
कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन
काँग्रेसच्या विकासकामांची माहिती
नरेंद्र मोदींच्या फसवेगिरीची पोलखोल
मुंबई, दि. 7 सप्टेंबर 2014:
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या तयारीला वेग आला आहे. पक्षाच्या प्रचार समितीने रविवारी ‘जिंकणारच’ आणि ‘मोदींनी केली जनतेची फसवणूक’ या दोन प्रचार पुस्तिकेंचे प्रकाशन केले. या पुस्तिकेंमधून कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची माहिती देऊन नरेंद्र मोदींच्या फसवेगिरीची पोलखोलही करण्यात आली आहे.
प्रदेश कार्यालय गांधी भवन येथे झालेल्या प्रकाशन कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, प्रचार समितीचे अध्यक्ष व राज्याचे उद्योग मंत्री श्री नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष आ.श्री शरद रणपिसे, आ.श्री हरिभाऊ राठोड, आ.श्री अनंत गाडगिळ, आ.श्री संजय दत्त, आ.श्री अमर राजूरकर, प्रदेश प्रवक्ते श्री सचिन सावंत, प्रचार समितीचे समन्वयक श्री बसवराज पाटील नागराळकर आदी नेते उपस्थित होते.
पुस्तिकेचे प्रकाशन झाल्यानंतर प्रमुख नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या प्रचाराचा भर पक्षाने केलेल्या विकासकामांवर असेल. विरोधक काहीही बोलत असले तरी काँग्रेसच्या काळात देशाचा व राज्याचा विकास झाला ही वस्तुस्थिती आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर अनेक विकास कामांचे उद्घाटन केले. ही सर्व कामे काँग्रेसच्याच काळात झालेली होती. भाजप-सेनेला 20 वर्षांपूर्वी राज्याची सत्ता मिळाली होती. परंतु, त्यांची कामगिरी शून्य राहिली. त्यामुळेच ते कधीही त्यांच्या कामाच्या बळावर मते मागत नाहीत. सत्तेसाठी ते वाट्टेल ती आश्वासने देण्याची त्यांची सवय आहे. लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींनी आश्वासनांचा वर्षाव केला होता. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडला आहे. मोदी सरकारचे शंभर दिवस देशाचा भ्रमनिरास करणारे होते. 100 दिवसात विदेशी बॅंकांमधील काळा पैसा परत आणण्याच्या वल्गना करणारे कुठे दडून बसले आहेत? 100 दिवसात 100 रूपये तरी परत आणले का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारच्या असमन्वयामुळे देशासमोर गंभीर वीजसंकट निर्माण होण्याची भीती आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. मागील आठवड्यात गुजरातमध्ये 3,500 मेगावॅटचे भारनियमन करण्यात आले, अशी माहिती श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. काँग्रेसने देशाचे दूरगामी हित लक्षात ठेवून योजना आयोगासारखी संस्था उभी केली. भाजपने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता ही संस्था क्षणात मोडीत काढली. वाजपेयींच्या काळात याच आयोगावर के.सी. पंत सारख्या अर्थतज्ज्ञाची नियुक्ती करण्यात आली होती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनीही काँग्रेसच्या विकास कामांचा संक्षिप्त आढावा घेऊन विरोधकांच्या फसवेगिरीवर प्रकाश टाकला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी पक्षाने घेतलेल्या विविध निर्णयांची त्यांनी माहिती दिली.
प्रचार समितीचे अध्यक्ष ना.श्री नारायणराव राणे यांनी प्रचारासंदर्भातील तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या कामांची आणि विरोधकांच्या फसवेगिरीची माहिती असावी, या हेतूने विविध पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू आहे. भाषणांमध्ये लोकांसमोर कोणते मुद्दे मांडावेत, कसे मांडावेत, कुठल्या मुद्यांवर व कशी चर्चा करावी, आदी विषयांची माहिती या पुस्तिकेंमधून दिली जाईल. काँग्रेसच्या समन्वय समितीचे अध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण यांनीही यावेळी विचार मांडले.
No comments:
Post a Comment