राज्य सरकारने सादर केलेल्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातून काँग्रेस आघाडीची वचनपूर्ती सिद्ध झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना आ.श्री ठाकरे म्हणाले की, 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीने अनेक वचने दिली होती. त्या वचनांची राज्य सरकारने नियोजनबद्ध पद्धतीने पूर्तता केली आहे. 2014-15 या आर्थिक वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या तरतूदींमधून देखील सरकारने वचनपूर्तीलाच प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होते.
महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात 1.05 लाख रूपयांपर्यंत झालेली घसघशित वाढ राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांचे यश आहे. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेसाठी राज्यातील 1.77 कोटी लाभार्थींचे दायित्व उचलण्यासंदर्भात अंतरिम अर्थसंकल्पात केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. क वर्ग नगर परिषदांना रोजगार हमी योजनेत समाविष्ट करून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने लहान शहरांमध्ये अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यासाठी ठोस पाऊल उचलल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेसाठी 698 कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करून राज्य सरकारने सामान्य नागरिकाला आरोग्याचा अधिकार प्रदान करण्यासंदर्भातील वचनपूर्ती केली आहे. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलांच्या उद्दिष्टात केलेली वाढ, रमाई आवास योजनेसाठी 333 कोटी रूपयांचा नियतव्यय, शहरी गरिबांना मुलभूत सुविधा, एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास कार्यक्रमाकरिता 675 कोटी रूपयांचा नियतव्यय आदी प्रस्ताव सामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरतील, असे आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
जलसिंचनासाठी 8,215 कोटी रूपये, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना एकरकमी सेवानिवृत्ती लाभ व मानधनातील वाढ, सुकन्या योजनेसाठी 187 कोटी रूपये, मदरसा आधुनिकीकरण, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आणि अल्पसंख्याक बहुल ग्रामिण क्षेत्र विकासासाठी 131 कोटी रूपये आदी निर्णयातून काँग्रेस आघाडी सरकारने जनतेला दिलेली विविध आश्वासने पूर्ण केली आहेत. शेतकरी, कामगार, नोकरदार, दलित, अल्पसंख्यक, आदिवासी, मागासवर्गीय, महिला अशा सर्वच घटकांचे हित समोर ठेवून घेतलेल्या विविध निर्णयांबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे आ.श्री माणिकराव ठाकरे म्हणाले.
No comments:
Post a Comment