मोदींच्या कार्यकाळात भारताच्या मूळ विचारधारेवरच आघात!
प्रदेश काँग्रेसच्या परिसंवादातील सूर
मुंबई, दि. 12 मे 2015:
घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आणि सर्वव्यापक धोरणांची दिशा दिली. परंतु, श्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नेमकी विपरित भूमिका स्वीकारली आहे. हा प्रकार म्हणजे डॉ. आंबेडकर आणि समकालीन नेत्यांनी अत्यंत दूरदर्शीपणे तयार केलेल्या भारताच्या मूळ विचारधारेवर आघात असल्याचा सूर प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या परिसंवादात उमटला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘वर्तमान राजकीय परिस्थिती आणि देशासमोरील आव्हाने’ या विषयावर प्रभादेवीस्थित रवींद्र नाट्य मंदिरात परिसंवादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर आणि ज्येष्ठ विचारवंत, संपादक श्री कुमार केतकर यांनी विचार मांडले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संजय निरूपम, माजी प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ नेते श्री शिवाजीराव देशमुख, माजी खासदार श्री एकनाथ गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. श्री अशोक चव्हाण यांनी डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशात सामाजिक समानतेचा, न्यायाचा पाया रोवला. सर्वसमावेशक आणि सर्वव्यापक समाजाची पायाभरणी केली. परंतु, काही घटकांनी हा पायाच उखडून टाकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात एका वेगळ्या, नकारात्मक वातावरणाची निर्मिती करण्याचे मनसुबे आखले जात आहेत. अशा घटकांच्या विरोधात संघर्ष करण्याच्या अनुषंगाने नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी काँग्रेस पक्ष वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे खा.श्री चव्हाण म्हणाले. मागील निवडणुकीत भलेही काँग्रेसचा पराभव झाला असेल. परंतु, त्यामुळे काँग्रेस खचलेली नाही आणि खचणारही नाही. शेतक-यांवर आणि सामान्य नागरिकांवर मोदी सरकारकडून होणा-या अन्यायामुळे काँग्रेस कार्यकर्ते पेटून उभे झाले आहेत. समाजातील विचारवंतांनी या लढ्याला वैचारिक दिशा आणि मानसिक पाठबळ द्यावे, असे आवाहन देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केले.
त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री श्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी परिसंवादातील सुमारे 47 मिनिटांच्या पहिल्या भाषणात स्वातंत्र्यानंतर तत्कालीन नेत्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, देशाच्या संविधानाची निर्मिती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयाला आर्थिक, सामाजिक न्याय देण्याची भूमिका मांडली. समाजातील विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला. सर्वांना समान संधी देण्याचे धोरण स्वीकारले. त्याकाळात सामाजिक न्यायाचा प्रश्न फार मोठा होता. अस्पृश्यता पाळली जात होती. धर्म-जातीच्या नावावर संबंधित व्यक्तीचे सामाजिक स्थान ठरवले जात होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर घटनानिर्मितीच्या वेळी सर्वप्रथम ही विषमता संपविण्याचे मोठे आव्हान डॉ. आंबेडकरांसमोर होते.
मागील 67 वर्षातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नेत्यांनी देशात आमुलाग्र बदलाचे धोरण स्वीकारले. देशाला आर्थिक पातळीवर सक्षम करण्याची योजना आखली. त्याचाच परिणाम म्हणून 30 कोटी लोकसंख्या असताना अन्नधान्याची आयात करणारा हा देश आज 125 कोटी लोकसंख्या असताना इतर देशांना अन्नधान्य निर्यात करताना दिसतो आहे. कधी काळी याचकाच्या भूमिकेत असलेला भारत आज दात्याच्या भूमिका साकारतो आहे. कोणी कितीही टीका केली तरी काँग्रेसने देशाच्या प्रगतीला दिशा दिली, ही वस्तुस्थिती असून ती कदापिही नाकारली जाऊ शकत नाही.
श्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी यावेळी व्यवस्थेतील उणिवांचाही उहापोह केला. भारताने आण्विक प्रगती केली. चंद्राला गवसणी घातली. परंतु, अजूनही देशात अपेक्षित स्तरावरील समानता प्रत्यक्षात उतरलेली नाही. स्त्री-पुरूष, समाज, जात, धर्माच्या नावाखाली अजूनही विषमतेला खतपाणी घालणारे घटक आपण संपवू शकलेलो नाही. समाजातील ही नकारात्मक संपविण्याचे मोठे आव्हान देशासमोर अजूनही कायम असल्याचे ते म्हणाले. समाजातील मूठभर घटकांना फायदा पोहचविण्याच्या विद्यमान काळातील सरकारी धोरणांवर त्यांनी कडाडून टीका केली. शेतकरी, व्यापारी, दुकानदारांप्रमाणेच उद्योगपतींनाही आपल्या व्यवसायातून नफा कमविण्याचा अधिकार असायला हवा. पण् नफा आणि लूट यातील अंतर त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी विषद केली.
नामवंत वरिष्ठ पत्रकार श्री कुमार केतकर यांनी या परिसंवादात बोलताना स्वतंत्र भारताच्या राजकीय व संसदीय इतिहासाचा संक्षिप्त आढावा घेतला. ते म्हणाले की, नेहरू विचार हाच काँग्रेसचा मूळ विचार असून, नेहरू विचाराला संपविल्याशिवाय काँग्रेस संपणार नाही, याची भाजपला पुरेपूर जाणिव आहे. त्यामुळे नेहरू आणि त्यांच्या वारसदारांचे प्रतीमाभंजन करण्याचा एककलमी कार्यक्रम ते सातत्याने राबवत आले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला, याचे कारण देखील भाजपने काँग्रेस विचारसरणीवर केलेल्या आघातातच दडलेले आहे.
मोदी सरकार आणि संघ परिवाराने विविध महापुरूषांची प्रतीमा कलुषित करण्यासंदर्भात आखलेली अनेक कारस्थाने त्यांनी यावेळी चव्हाट्यावर आणली. ज्या गोडसेचे संघ परिवाराकडून सातत्याने उदात्तीकरण केले जाते, त्याच गोडसेने राष्ट्रपित्याची हत्या केली होती, हा इतिहास मोदी आणि भाजप नजरेआड करू पाहत आहे. संघाला इतिहास नाही, संघाकडे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे नेतेही नाहीत. त्यामुळेच त्यांना अचानक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी महामानवांचा पुळका आला आहे. महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा पंडित नेहरू व सरदार पटेल आदी नेत्यांमधील कपोलकल्पीत वाद रंगवले जात आहेत. या अपप्रचाराचा काही अंशी भाजपला फायदा झाला असेल. परंतु, हा प्रभाव फार काळ टिकणार नाही. देशाचा खरा इतिहास जनतेसमोर मांडण्याचे काम काँग्रेसने केले पाहिजे, असे श्री केतकर म्हणाले.
पंतप्रधान म्हणून श्री नरेंद्र मोदी यांच्या कामकाजावरही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. पंडित नेहरूंवर भाजप टीका करते. परंतु, नेहरू सर्वांना सोबत घेऊन काम करणारे पंतप्रधान होते. इतरांच्या कल्पना स्वीकारून, मंत्र्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेणारे पंतप्रधान होते. ते आजच्या पंतप्रधानांसारखे एककल्ली निर्णय घेणारे किंवा इतरांवर फक्त आपल्याच कल्पना लादणारे पंतप्रधान नव्हते, अशी टीका त्यांनी केली. विदेशात जाऊन आपल्याच देशातील राजकीय नेत्यांची बदनामी करणारी विधाने पंतप्रधानांना शोभत नाहीत. सामाजित सभ्यतेच्या अभावाचा हा गूण त्यांनी कदाचित संघातून उचलला असावा, असे श्री केतकर पुढे म्हणाले.
भाजपकडून ‘अच्छे दिन’चा नारा दिला जातो. परंतु, मुळात देशात कुठेही ‘अच्छे दिन’चा थांगपत्ता नाही. काँग्रेस उपाध्यक्ष खा.श्री राहूल गांधी यांनी लोकसभेत मोदींवर केलेली टीका भाजपला झोंबली कारण ती खरी होती. निवडणुकीच्या काळात मदत करणा-या उद्योगपती मित्रांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी मोदी सरकारने भू-संपादन कायद्यात सुधारणा करण्याचा घाट घातला आहे. शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी या प्रयत्नांना अत्यंत कठोरपणे विरोध करण्याची गरज आहे. मागील वर्षभरात मोदींच्या उद्योगपती मित्रांना अपेक्षित असलेल्या आर्थिक सुधारणा करण्यात मोदींना यश आलेले नाही. त्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती पुन्हा ढासळते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशभरातील देवस्थाने आणि नागरिकांकडे असलेले सोने अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची घोषणा केली. उद्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जाऊन हात पसरण्याची वेळ आलीच तर सोन्याचा साठा हाताशी असावा, या हेतूने त्यांनी खेळी केल्याचे श्री कुमार केतकरांनी सांगितले.
भारताच्या संसदीय इतिहासात काँग्रेस अनेकदा प्रतिकूल परिस्थितीला सामोरी गेली आहे. काँग्रेसचे अस्तित्व संपले की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती यापूर्वीही अनेकदा निर्माण झाली आहे. परंतु, दरवेळी काँग्रेसने नव्याने उभारी घेतली. विरोधकांचे आडाखे चुकवून मोठाले विजय प्राप्त केले आहेत. जनतेमध्ये मोदींप्रती आकर्षण असू शकेल, काही अंशी त्यांचा प्रभावही असू शकेल. परंतु, जनतेमध्ये मोदींबद्दल काँग्रेससारखे प्रेम नाही. पंडित नेहरू असो वा इंदिरा गांधी, या नेत्यांची गरिबांचे कैवारी म्हणून प्रतीमा होती आणि ती अजूनही टिकून आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना देखील जनता याच रूपात बघते. त्यामुळे काँग्रेसबद्दल सर्वसामान्य वर्गाची आस्थादेखील कायम असून, पुढील काळात ती हमखास दिसून येईल, असा विश्वास श्री कुमार केतकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुषंजली अर्पण करण्यात आली. परिसंवादानंतर दोन्ही वक्त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संजय निरूपम तर सूत्रसंचालन प्रदेश सरचिटणीस अॅड. श्री गणेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment