Monday, 28 March 2016

मंत्रालयासमोरील शेतकरी आत्महत्या, चवदार तळ्याचे शुद्धीकरण आणि विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाच्या तक्रारी प्रकरणी विधानसभेचे कामकाज ठप्प विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडले स्थगन प्रस्ताव

मंत्रालयासमोरील शेतकरी आत्महत्या, चवदार तळ्याचे शुद्धीकरण
आणि विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाच्या तक्रारी प्रकरणी विधानसभेचे कामकाज ठप्प
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडले स्थगन प्रस्ताव
मुंबई, दि. २८ मार्च २०१६:
नांदेड जिल्ह्यातील तरुण शेतकरी माधव कदम यांनी मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, महाड येथील चवदार तळ्याचे हेतूपुरस्सर केलेले शुद्धीकरण आणि पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात आंबेडकरवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात झालेल्या प्रयत्नांचे आज विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या तीनही मुद्द्यांवर दिवसभरात अनेकदा सभागृहाचे कामकाज बंद पडले व दुपारनंतर ते दिवसभरासाठी तहकूब झाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हे तीनही मुद्दे सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे स्थगन प्रस्ताव स्वीकारल्या न गेल्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आदी विरोधी पक्षांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. मंत्रालयासमोर झालेल्या शेतकरी आत्महत्येच्या अनुषंगाने कर्जमाफी व शेतकऱ्यांना थेट भरीव आर्थिक मदतीवर चर्चा करून सदरहू शेतकऱ्याला सभागृहात श्रद्धांजली अर्पण करावी, चवदार तळ्याच्या शुद्धीकरणामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाचा अवमान झाल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करून सरकारने देशाची जाहीर माफी मागावी, तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ व मनुवादाविरोधात नारेबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर देशविरोधी गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या प्राचार्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अकोला जिल्हातील बार्शीटाकळी येथे धम्म प्रचारकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तक्रारही दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, आदी मागण्या विरोधी पक्षांनी लावून धरल्या होत्या. परंतु, सरकारने त्यास प्रतिसाद न दिल्याने विरोधी पक्षांनी सभागृह दणाणून सोडले.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चौथ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील काही दिवसात घडलेल्या सामाजिक प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मंत्रालयासमोर येऊन आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, ही घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. राज्याच्या दृष्टीने हा काळा दिवस असल्याचा उल्लेख करून विरोधी पक्षनेत्यांनी राज्यात सलग ४ वर्षांपासून पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने कर्जमाफी योजना जाहीर करावी, ही मागणी सभागृहात पुन्हा उपस्थित केली. शेतकऱ्यांप्रती सरकारला कोणत्याही संवेदना उरलेल्या नाहीत. सरकारने वारंवार केलेल्या पॅकेजच्या घोषणा फसव्या असून सरकारचे कोणतेही निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. योग्यवेळ आल्यावर  कर्जमाफीचा निर्णय करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण सरकार आता कर्जमाफीसाठी जिल्हा परिषद निवडणुकांची वाट पाहत आहे का? असा सवालही विखे पाटील यांनी उपस्थित केला.
महाड येथील चवदार तळ्याच्या आंदोलनाला ऐतिहासिक आणि सामाजिक सुधारणेची  पार्श्वभूमी असतानाही तळ्याचे शुद्धीकरण करण्याची घटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणारी आहे. या घटनेचा निषेध करून विखे पाटील पुढे म्हणाले की, जलसंपदा विभागाने नद्यांचे पूजन करण्याचे आदेश दिले होते. मात्र चवदार तळ्याचे  शुद्धीकरणाचा घाट घालून सत्ताधारी पक्षातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू सुजत आंबेडकर याच्यासह दलित चळवळीतील विद्यार्थी कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घेतला. हा निर्णय कोणाच्या दबावामुळे घेण्यात आला, याचा खुलासा करून सरकारने प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करून विखे पाटील म्हणाले की, या सर्व सामाजिक घटना गंभीर असून सरकारच राज्यात सामाजिक विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यापासून दलितांवरील वाढते हल्ले विचारात घेतले तर या सरकारची वृत्ती आणि कृती ही खूप वेगळी असून अशा सामाजिक घटना घडत असतानाही सरकार शांतपणे बघायची भूमिका घेते. यावरून सरकारच्या भूमिकेचा खरा चेहरा पुढे आला असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

No comments:

Post a Comment