येता पावसाळा मुंबईकरांसाठी आनंददायी करण्यासाठी
आपण सर्वांनी प्रयत्न करु या- महापालिका आयुक्त
मुंबई शहराचा जागतिक स्तरावरील नावलौकिक व देशाची आर्थिक राजधानी हे महत्व लक्षात घेता, मुंबई शहरातील सर्व नागरी सेवा-सुविधांचा दर्जा हा उत्कृष्टच असायला हवा तसेच या संदर्भात महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे म्हणून हाती घेतलेली सर्व कामे येत्या मे अखेरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करुन येणारा पावसाळा हा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आनंददायी करण्याचा प्रयत्न आपण सर्व अधिकाऱयांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत केले.
मुंबई शहर आपत्कालिन नियंत्रण संस्थेचे अध्यक्ष व महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नायर दंत महाविद्यालयाच्या सभागृहात पालिकेतील सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख व इतर प्राधिकरणांच्या अधिकाऱयांसमवेत आज (दिनांक २८ एप्रिल, २०१५) आढावा बैठक आयोजित केली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त सर्वश्री एस. व्ही. आर. श्रीनिवास, डॉ. संजय मुखर्जी, संजय देशमुख व डॉ. श्रीम. पल्लवी दराडे, मुंबईच्या जिल्हाधिकारी श्रीम. शैला ए, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री.शेखर चन्ने तसेच आर्मी व नेव्ही, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पी.डब्लू.डी., एम.एस.आर.डी.सी., मध्य व पश्चिम रेल्वे, मुंबई वाहतूक पोलिस, रिलायन्स या संस्थांचे अधिकारीही उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांनी पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीस संबोधित करताना बृहन्मुंबईतील पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, शहरातील अतिधोकादायक इमारती, रस्ते व पदपथांची अवस्था, पावसाळयात येणारे विविध जलजन्य व इतर आजार, कचरा संकलन व त्याची विल्हेवाट या ५ मुद्दयांवर आपण विशेष भर देणार असल्याचे सांगितले. याबाबतीत संपूर्ण बृहन्मुंबईत पाणी साचण्याची ४० ठिकाणे असल्याचे नमूद करुन महापालिकेने हाती घेतलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे या ४० ठिकाणांची संख्या आणखीन कमी होईल असे संबंधित अधिकाऱयांनी पहावे तसेच, विशेषतः छोटे रस्ते व गल्ल्या यांची स्वच्छता करुन त्याचे व्यवस्थितरित्या परिरक्षण करावे असे आदेश दिले.
अतिधोकादायक इमारतींबाबत अधिकाऱयांनी अशा इमारती मालकांवर नोटीस तसेच सर्व ती कायदेशीर प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबवावी, अतिधोकादायक इमारतींमध्ये जर महापालिका रुग्णालय अथवा शाळा असतील तर कोणत्याही परिस्थितीत अशा ठिकाणी दुर्घटना घडणार नाही याबाबत दक्ष रहावे. मनुष्य जीवन हे अत्यंत मोलाचे असून त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे महापालिका आयुक्त श्री. मेहता यांनी उपस्थित अधिकाऱयांना निक्षून सांगितले.
रस्त्यांवरील खड्डयांबाबत अत्यंत सडेतोड भूमिका मांडताना महापालिका आयुक्त श्री.मेहता यांनी मुंबईतील रस्ते हे चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत तसेच ज्या रस्त्यांवर खड्डे अथवा काही कारणामुळे असमतलपणा आला असेल, त्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन असे रस्ते समतल करावेत की, रस्ते हे आकर्षक दिसतील व त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही.
मुंबई शहराच्या सर्वांगीण आरोग्याबाबत आपण अत्यंत प्रभावीपणे उपाययोजना अंमलात आणणार असून काविळ, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू अशा रोगांची सातत्यपूर्ण ठिकाणे शोधून त्याचे मॅपिंग करावे आणि मॅपिंग केलेल्या विभागांमध्ये अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव पुन्हा-पुन्हा होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी, असे कडक निर्देशही आरोग्य खात्यातील अधिकाऱयांना दिले. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करावी व उघडयावर बनविण्यात येणाऱया अन्नपदार्थांमुळे रोगराईस आमंत्रण देणाऱया खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी असेही आयुक्तांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका कचरा संकलन व विल्हेवाट याबाबत चांगले कार्य करीत असली तरी कचऱयामुळे होणाऱया रोगराईस, अस्वच्छतेस कोणत्याही प्रकारे थारा न देता कचरा हा नियमितपणे उचललाच पाहिजे, असे स्पष्ट निर्देशही महापालिका आयुक्त श्री. मेहता यांनी उपस्थित अधिकाऱयांना दिले.
प्रत्येक खात्यातील अधिकाऱयांनी जनतेच्या हितास प्राधान्य देऊन नागरिकांचे दुःख हे आपले दुःख मानून स्वतः त्यांच्यासमवेत उपस्थित राहिल्यास महापालिका नागरिकांसाठी काहीतरी करीत आहे, हे त्यांच्या मनावर ठरविण्यासाठी सर्वांनी कार्यतत्पर रहावे असेही महापालिका आयुक्तांनी अधिकाऱयांना सांगितले. सर्वसामान्य मुंबईकरांसाठी महापालिका राबवित असलेल्या विविध सेवा-सुविधा या सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येक अधिकाऱयाने मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावावा, असेही महापालिका आयुक्तांनी सांगितले. महापालिका आयुक्तांनी या आढावा बैठकीत मांडलेल्या ५ मुद्दयांबाबत सांगताना या सर्व ५ मुद्दयांचा वरिष्ठ पातळीवर वेळोवेळी आढावा घेण्यात येईल व तेव्हा जर कोणताही अधिकारी दोषी आढळला तर त्याला जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल अशी कडक समजही महापालिका आयुक्तांनी उपस्थित अधिकाऱयांना दिली.
सुरुवातीला, महापालिका आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांचा एकंदरीत आढावा घेतला. यामध्ये आपत्कालिन नियंत्रण कक्षातील सेवा-सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, भरती-ओहोटीच्या तारखा, स्वयंचलित हवामान केंद्र, पावसाळी पाण्याची गटारे, आरोग्य, शिक्षण, रस्ते, इमारती परिरक्षण व मालमत्ता, उद्याने, मुंबई अग्निशमन दल, विभागीय कार्यालये याद्वारे करावयाच्या विविध उपाययोजनांचा समावेश होता.
तसेच यासंबंधी मध्य व पश्चिम रेल्वे, बी.ई.एस.टी., मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एम.एस.आर.डी.सी., मुंबई वाहतूक पोलिस, नौदल, राष्ट्रीय आपत्कालिन प्रतिसाद दल, भारतीय हवामान खाते, नागरी संरक्षण दल, मुंबई विमानतळ प्राधिकरण, रिलायन्स एनर्जी या इतर आस्थापनांच्या अधिकाऱयांकडून महापालिका आयुक्त यांनी आढावा घेऊन त्यांना योग्य ते निर्देश दिले.
***
No comments:
Post a Comment