मुलुंड परिसराचे कचरा मुक्तीच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल
महापालिकेच्या 'टी' विभागातील प्रायोगिक मोहिमेंतर्गत २५ खुल्या कचराकुंड्या बंद
'टी' विभागाच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात कार्यवाही करण्याचे आयुक्तांचे निर्देश
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छता विषयक बाबींचे व्यवस्थापन,नियोजन अधिक प्रभावीपणे करुन मुंबई अधिकाधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी मुंबई महापालिका अव्याहतपणे कार्यरत आहे. याच कार्यवाहीचा भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील खुल्या कचराकुंड्या (Garbage Dumps / Open Dumps)बंद करण्यात येऊन त्या ऐवजी घर ते घर (House to House) किंवा सोसायटी ते सोसायटी या पध्दतीने कचरा गोळा करण्याची पध्दत महापालिकेच्या 'टी' विभागात प्रायोगिक स्तरावर सुरु करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या मासिक आढावा बैठकी दरम्यान महापालिका आयुक्तांनी 'टी' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असलेल्या 'खुल्या कचराकुंडी मुक्त परिसर' मोहिमेची प्रशंसा केली.तसेच 'टी' विभागाच्या धर्तीवर महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ही पध्दत राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ व साधनसामुग्री उपलब्ध करुन घेण्याचे आदेश मा.आयुक्तांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.
'खुल्या कचराकुंडी मुक्त परिसर' मोहिमेंतर्गत `टी' विभागातील निवडणूक प्रभाग क्रमांक १०३ मधील १९ तर इतर प्रभागीतील ६ ठिकाणच्या खुल्या कचराकुंड्या देखील बंद करण्यात आल्या आहेत. यानुसार 'टी'विभागातील एकूण २५ खुल्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच'टी' विभागातील उर्वरित खुल्या कचराकुंड्या देखील बंद करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली असून `टी' विभागात राबविण्यात येत असलेल्या खुल्या कचरा कुंड्यामुक्त मोहिमेस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
'टी' विभागातील 'खुल्या कचराकुंड्या मुक्त परिसर' या मोहिमेंतर्गत ज्या परिसरातील खुल्या कचराकुंड्या बंद करण्यात आल्या आहेत, त्या परिसरातील कचरा महापालिकेच्या कचरा वाहक गाडीद्वारे गोळा करण्यात येत आहे. यानुसार आता निर्धारित करण्यात आलेल्या वेळेस महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी प्रत्येक सोसायटी / घराच्या पुढे जात आहे. सदर वेळेस संबंधितांनी महापालिकेच्या कचरा गाडीत कचरा आणून टाकणे अपेक्षित आहे.
विशेष म्हणजे या पध्दतीमध्ये कोणतीही समस्या अथवा तक्रार उद्भवल्यास संबंधित नागरिक लघुसंदेश (एसएमएस), व्हॉट्स ऍप, एन्ड्रॉईड ऍप्लिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे संपर्क साधू शकणार आहेत. ज्यामुळे संबंधित तक्रारीचे निवारण अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे. याप्रकारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी निवडणूक प्रभाग क्र. १०३ चे स्थानिक नगरसेवक श्री. मनोज कोटक यांचे सहकार्य लाभले आहे.
सदर मोहिमेबाबतची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे :
- महापालिकेच्या 'टी' विभागांतर्गत येणा-या प्रभाग क्रमांक १०३ ची लोकसंख्या ५८,६८९ इतकी आहे. या प्रभागात ३८५ सोसायटी असून १६३५ व्यवसायिक आस्थापना आहेत.
- या प्रभागातून दररोज साधारणपणे २४ मे. टन कचरा निर्माण होत असतो
- 'खुल्या कचराकुंड्या मुक्त परिसर' ही मोहिम या प्रभागात यशस्वीपणे राबविण्यात आली.
- या परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी 'हाऊस टू हाऊस' ही पध्दत अवलंबिण्यात आली. या अंतर्गत निर्धारित करण्यात आलेल्या वेळेस महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी या परिसरात फिरते.त्यावेळी सोसायटी / घर येथील संबंधितांनी त्यांच्या सोसायटीतील कचरा महापालिकेच्या सदर गाडीत आणून टाकणे अपेक्षित आहे
- परिसरातील प्रत्येक रस्त्यावरुन महापालिकेची कचरा गोळा करणारी गाडी दोन वेळा फिरेल अशा पध्दतीने नियोजन करण्यात आले आहे
- कचरा गोळा करणे सुलभ व सहज व्हावे याकरिता विशेषरित्या डिझाईन केलेल्या तीन चाकी गाड्यादेखील उपयोगात आणल्या जात आहेत
- ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सदर परिसरातील नागरिकांबरोबरच महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या कर्मचा-यांचे व कामगारांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले आहे
- परिसरातील ४० सोसायट्यांमध्ये ओल्या कच-यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यासाठी खड्डे देखील तयार करण्यात आले आहेत व याबाबतची पुढील कार्यवाही सध्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने सुरु आहे
- कचरा गोळा करण्याबाबत काही समस्या उद्भवल्यास लघुसंदेश(एसएमएस), व्हॉट्स ऍप, एन्ड्रॉईड ऍप्लिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरिकांना महापालिकेच्या विभाग कार्यालयाकडे संपर्क साधता येणार आहे
- एसएमएस किंवा व्हॉट्स ऍप संदेश पाठवावयाचा झाल्यास तो ९९७०-००१३१२ तो या क्रमांकावर पाठवावा. (उदा. BMCT103 Garbage Not Collected since two days!! Ward No 103 XYZ Road, Near ABC Garden, Mr. Rajiv)
- व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदवितांना त्यामध्ये संबधित छायाचित्र अपलोड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे
- वरीलनुसार एसएमएस किंवा व्हॉट्स ऍपद्वारे तक्रार नोंदविल्यानंतर संबंधितास लगेचच तक्रार क्रमांक व संबंधित माहिती असलेला संदेश प्राप्त होतो. तसेच तक्रार नोंदविल्यापासून १२ तासामध्ये त्याबाबतची कार्यवाही केली जाते. विशेष म्हणजे कार्यवाही पूर्ण झाल्यावर त्याबाबतचा लघुसंदेश देखील तक्रारदाराच्या भ्रमणध्वनीवर पाठविला जातो.
- यासाठीचे एन्ड्रॉईड ऍप्लिकेशन 'APPSTORE' वर उपलब्ध आहे. या ऍपचे नाव 'BMC T Ward Grievance Redressal' असे आहे
No comments:
Post a Comment