योकोहामा प्रशासनासोबत कचरा व्यवस्थापनावर महापालिकेचा विचारविनिमय
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रति दिवशी सुमारे १० हजार मेट्रिक टन कचरा
निर्माण होतो. यापैकी सुमारे चार हजार मेट्रिक टन कचऱयांवर प्रक्रिया केली जाते. जपानमधील योकोहामा शहरात निर्माण होणाऱया ५ हजार मेट्रिक टन कचऱयावर पूर्णतः प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थापन केले जाते. या अनुषंगाने मुंबई व योकोहामा शहरादरम्यान आज कचरा व्यवस्थापन विषयावर विचारविनिमय करण्यात आला.
योकोहामा शहराचे मुंबईतील वाणिज्य दूत श्री. यामामोटो यांनी आज (दिनांक ९ फेब्रुवारी २०१६) अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांची त्यांच्या दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपायुक्त (घन कचरा व्यवस्थापन) श्री. विजय बालमवार, योकोहामा शहराच्या संशोधक आणि पुनर्व्यवस्थापन प्रमुख श्रीमती अक्की यामाकोशी, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) श्री अन्सारी हे उपस्थित होते.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, मुंबई महानगरात प्रतिदिन सुमारे १० हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यापैकी सुमारे चार हजार मेट्रिक टन कचऱयावर प्रक्रिया करुन व्यवस्थापन केले जाते. तर उर्वरित कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील क्षेपणभूमीवर नेण्यात येतो.
जपान देशातील योकोहामा शहरात प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. या संपूर्ण कचऱयावर प्रक्रिया करुन त्याचे व्यवस्थापन केले जाते. या प्रक्रियेमध्ये काही कचरा शास्त्रोक्तरित्या नष्ट केला जातो. तर काही कचऱयाचे भराव टाकून व्यवस्थापन केले जाते. योकोहामात मॉल्स, शाळा, स्थानिक संस्था अशा ठिकाणी कचऱयाचे १० वेगवेगळ्या स्वरुपात वर्गीकरण केले जाते.
बृहन्मुंबई महानगरपालिका व योकोहामा यांच्या संयुक्त विद्यमाने या कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विचारविनिमय करुन या समस्येविषयी कायमस्वरुपी तोडग्याबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे व योकोहामाचे वाणिज्य दूत श्री. यामामोटो यांच्यात आज सकारात्मक पद्धतीने चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment