Tuesday, 2 February 2016

मिफ्फच्या राष्ट्रीय स्पर्धा विभागातील परिक्षकांचा पत्रकारांशी संवाद

मिफ्फच्या राष्ट्रीय स्पर्धा विभागातील परिक्षकांचा पत्रकारांशी संवाद
०२ फेब्रुवारी, २०१६
१४ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे राष्ट्रीय स्पर्धा विभागातील परिक्षकांनी आज मिफ्फ मिडिया सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधला. उमा डी. कुन्हा, ऑड्रियस स्टोनिस, बीजू धनपालन यांचा यामध्ये समावेश होता.
या महोत्सवातील काही चित्रपटांची गुणवत्ता कमालीची असून, चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्याची त्यांची क्षमता असल्याचे ऑड्रियस स्टोनिस यांनी सांगितले. या चित्रपट निर्मात्यांनी आपली गुणवत्ता जगासमोर आणण्यांसाठी आपले चित्रपट विविध महोत्सवात प्रदर्शित करण्यांसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरायचे असेल तर त्यांनी व्याप्ती कशी वाढवावी, जास्तीतजास्त महोत्सवांपर्यंत कसे पोहचले पाहिजे, चित्रपटासाठी पैसा कसा ऊभा केला पाहिजे या गोष्टी शिकण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या महोत्सवांतील चित्रपटांची निवड, उत्तम आयोजन याबद्दल त्यांनी कौतुक केले. मात्र चित्रपटांचे वैविध्य बघता सर्व चित्रपटांना एकाच तराजूत तोलता येऊ शकत नाही त्यामुळे चित्रपट निवडीसाठी आणखी विविध निकष अंतर्भूत करण्यांची गरज त्यांनी व्यक्त केली.
महोत्सवातील चित्रपटांच्या गुणवत्तेचे कौतुक करत सर्व चित्रपटांना न्याय दयायचा असेल तर हा महोत्सव आणखी मोठया प्रमाणार दरवर्षी झाला पाहिजे अशी अपेक्षा यांनी उमा डी. कुन्हा यांनी व्यक्त केली. प्रत्येक महोत्सवाचे एक स्वतंत्र स्थान असते त्यामुळे महोत्सवाची तुलना करणे संयुक्तिक ठरणार नाही असे त्यांनी नमूद केले. पुरस्कार कोणताही असो तो मौल्यवानच असतो असे त्या म्हणाल्या. चित्रपटांचे वितरण आणि त्यांचे प्रदर्शन हे भारतातील चित्रपट निर्मितीतील प्रमुख अडथळे आहेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन एकाच ठिकाणी झाल्यास त्याचा सर्वांना मोठा फायदा होईल असे त्या म्हणाल्या. महोत्सवातील चित्रपटांची संख्या कमी करुन त्यांचे प्रदर्शन एकदाच होण्याऐवजी दोन ते तीन वेळा झाले पाहिजे अशी सूचनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment