Tuesday, 15 December 2015

अपघाती निधन झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे विखे पाटील यांनी केले सांत्वन!





अपघाती निधन झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे विखे पाटील यांनी केले सांत्वन!
नागपूर, दि. १५ डिसेंबर २०१५:
नागपूर येथील शेतकरी मोर्चातून घरी परताना अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेले झाडगाव, ता.आष्टी, जि. वर्धा येथील कॉंग्रेस कार्यकर्ते गजानन शेंदरे यांच्या कुटुंबियांची आज सकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले.
हिवाळी अधिवेशनादरम्यान दि. ८ डिसेंबर २०१५ रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये वर्धा जिल्ह्यातील झाडगावचे रहिवासी असलेले कॉंग्रेस कार्यकर्ते गजानन शेंदरे आणि गुरुदेव मानकर देखील सहभागी झाले होते. मोर्चातून गावी परतताना अपघात होऊन गजानन शेंदरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर गुरुदेव मानकर गंभीर जखमी झाले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी झाडगाव येथे जाऊन आज दोन्ही कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिवंगत शेंदरे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून विखे पाटील यांनी त्यांना पक्षाकडून मदत म्हणून १ लाख रुपये दिले. या अपघातात जखमी झालेले कॉंग्रेस कार्यकर्ते गुरुदेव मानकर यांच्यावर नागपूरला उपचार सुरु आहेत. विखे पाटील यांनी मानकर यांच्या उपचारासाठी तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची मदत केली. या दोन्ही कुटुंबियांच्या भेटीदरम्यान आर्वीचे आमदार अमर काळे यांच्यासह कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment