वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेची धडक कारवाई !
८ अनधिकृत हॉटेल्स व ९ अनधिकृत दुकानांवर महापालिकेच्या एच / पश्चिम विभागाची कारवाई
बृहन्मुंबई महापालिकेच्या एच / पश्चिम विभागाने आज वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करित ८ अनधिकृत हॉटेल्स व ९ अनधिकृत दुकानांवर निष्कासनाची कारवाई केली आहे. यामुळे वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रस्ते व पदपथ मोकळे झाल्याने आता वाहनांची वाहतूक अधिक सुकरपणे होण्यास आणि पादचा-यांना देखील सुखकर आवागमन करण्यास मदत होणार आहे. याशिवाय वांद्रे रेक्लेमेशन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर देखील मोठी कारवाई करण्यात येऊन संबंधित बांधकामे तोडण्यात आली आहेत.
वांद्रे पश्चिम भागातील यादगार हॉटेल, दानिश कबाब कॉर्नर, सिख कबाब कॉर्नर यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई आज करण्यात आली. याशिवाय काही अत्तर आणि लेखन विषयक साहित्याच्या दुकानांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे रेक्लेमेशन भागातील मसाला झोन आणि बिग बाईट्स सारख्या आस्थापनांद्वारे करण्यात आलेले वाढीव स्वरुपाचे अनधिकृत बांधकामही निष्कासित करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या एच / पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक अभियंता राजेश यादव, दुय्यम अभियंता भोसले यांच्या संबंधित चमूद्वारे ही अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.
No comments:
Post a Comment