Monday, 12 September 2016

सचिन सावंत यांचे राम कदम यांना जाहीर आव्हान

कपिल शर्मा यांच्या घरासमोर जसे आंदोलन केले तसे गिरीष महाजन यांच्या घरासमोर आंदोलन करावे. सचिन सावंत यांचे राम कदम यांना जाहीर आव्हान मुंबई, दि 12 सप्टेंबर, 2016: मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिका-यांची नावे उघड करावीत म्हणून कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करणारे भाजप आमदार राम कदम यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना लाच देऊ करणा-या ठेकेदारांची नावे जाहीर करावी, म्हणून महाजन यांच्या घरासमोर आंदोलन करावे, असे जाहीर आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे. मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी आपल्याला पाच लाख रूपयांची लाच मागितली असा आरोप कपिल शर्माने ट्वीट करून केला होता. त्यांच्या या ट्वीटमुळे शिवसेना भाजपचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला, याचमुळे नैतिकतेचे उसने अवसान आणित भाजप आमदार राम कदम यांनी कपिल शर्माच्या घरासमोर आंदोलन करून भ्रष्ट अधिका-यांची नावे जाहीर करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. दीड वर्षापूर्वी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनीही अशाच प्रकारे जलसंपदा विभागाच्या काही ठेकेदारांनी आपल्याला 100 कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट केला होता. या ठेकेदारांची नावे महाजन यांनी जाहीर करावीत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती, तसेच या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवून चौकशीची मागणीही केली होती. कपिल शर्माच्या ट्वीटवर तातडीने चौकशीचे आदेश देणा-या माननीय मुख्यमंत्र्यांनी आता गिरीष महाजन यांना लाच देणा-या ठेकेदारांची नावे उघड करण्याचे आदेश द्यावेत व दीड वर्षापासून ही नावे का लपवलेली आहेत याचा जाब ही विचारावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे. कपिल शर्मा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे अशी विचारणा करणा-या आमदार राम कदम यांनी, गिरीष महाजनांच्या घरासमोर आंदोलन करून महाजन नेमके भाजपच्या कोणत्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली नावे दडवीत आहेत ? अशी विचारणा करण्याचे धाडस दाखवावे अन्यथा हे नेहमीप्रमाणे भाजपच्या नैतिकतेचे ढोंग ठरेल असे सावंत म्हणाले.

No comments:

Post a Comment