Monday, 26 September 2016

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान

मुस्लीम आणि मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका अप्रमाणिकः नसीम खान   मुंबई दि. 26 सप्टेंबर 2016   मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याबात राज्य सरकार गंभीर नाही. सरकारने तात्काळ मुस्लीम आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकारविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी दिला आहे.  गांधीभवन येथे पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की काँग्रेस सरकारने मुस्लीम आणि मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र राज्यात आलेल्या भाजप सरकारने काँग्रेस सरकारने काढलेल्या आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर न केल्याने मुस्लीम समाजाचे आरक्षण बंद झाले. काँग्रेस पक्षाने विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर मुस्लीम आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी वारंवार केली. मात्र भाजप सरकारला मुस्लिमांना आरक्षण द्यायचेच नसल्याने त्यांनी अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधानसभेत बिल आणले नाही. काँग्रेस सरकारने दिलेले आरक्षण भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले, असा आरोप नसीम खान यांनी केला आहे.   मुंबई हायकोर्टाने सुध्दा मुस्लिमांना दिलेले शैक्षणिक आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली आहे. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर नाही तर सामाजिक आणि आर्थिक मागास असल्याच्या आधारावर काँग्रेस सरकारने पाच टक्के आरक्षण दिले होते.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना देशातल्या मुस्लिमांच्या विकासाबाबत बाजू मांडली आहे. पण भाजप सरकारचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिमांच्या विकासाच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र मुस्लिमांच्या हक्काचे आरक्षण देत नाहीत. मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी अशी मागणी नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.  

No comments:

Post a Comment