Thursday, 26 November 2015

26/11 च्या स्मृतिदिनी भारत-पाक मालिकेला परवानगी मिळावी हे दुर्दैव! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बीसीसीआयवर टीकास्त्र

26/11 च्या स्मृतिदिनी भारत-पाक मालिकेला परवानगी मिळावी हे दुर्दैव!
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बीसीसीआयवर टीकास्त्र
अहमदनगर, दि. 26 नोव्हेंबर 2015:
पाक पुरस्कृत 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या स्मृतिदिनी संपूर्ण भारतात शहिदांना आदरांजली वाहिली जात असताना त्याच दिवशी श्रीलंकेत भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळविण्यास परवानगी मिळावी, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
भारत-पाक मालिकेला परवानगी मिळाल्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, बीसीसीआयने पैसा मिळविण्यासाठी नीतिमत्ता गहाण ठेवली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यातून सर्वसामान्यांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांना प्राणांची आहुती द्यावी लागली होती आणि हेच पोलीस मुंबईतील क्रिकेट सामन्यांच्या यशस्वी आयोजनासाठी रात्रं-दिवस डोळ्यात तेल घालून सहकार्य करतात, याचाही विसर बीसीसीआयला पडलेला दिसतो. 2014मध्ये हेमराज नामक जवानाचा पाकिस्तानने शिरच्छेद केल्यापासून उभय देशातील संबंध ताणले गेले आहेत. तेव्हापासून पाकिस्तानच्या कारवाया कमी झालेल्या नसताना पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळविण्याचा बीसीसीआयचा अट्टहास कशासाठी, अशी विचारणा विरोधी पक्षनेत्यांनी केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी शरद पवारांच्या सूचनेवर नुकतेच शशांक मनोहर आरूढ झाले असून, दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पोगरवाडीला भेट देऊन शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले होते. शरद पवारांनी किमान कर्नल महाडिकांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवून तरी शशांक मनोहरांना ही मालिका रद्द करण्याची सूचना करायला हवी, असे विखे पाटील पुढे म्हणाले.
भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने या मालिकेला परवानगी दिल्यामुळे त्यांचीही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपने ‘एक सिर के बदले 10 सिर’ची भाषा केली होती. मात्र, तीच भाजप आता ही मालिका खेळविण्यासाठी आग्रही दिसते, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिवसेनेने भारत-पाक मालिकेला विरोध केला होता. ते केंद्रात आणि राज्यात भाजपसमवेत सत्तेचे वाटेकरी आहेत. तरीही भाजपने शिवसेनेच्या नाकावर टिच्चून भारत-पाक मालिका खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शिवसेनेची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांनी भाजपच्या केंद्र सरकारला ही मालिका रद्द करण्यास भाग पाडावे, असे विखे पाटील पुढे म्हणाले.

No comments:

Post a Comment