Thursday, 5 November 2015

कोपरगावात तूर डाळीचा भाव १८० रूपये विखे पाटील यांच्या पाहणीत सरकारच्या घोषणेतील फोलपणा उघड

कोपरगावात तूर डाळीचा भाव १८० रूपये
विखे पाटील यांच्या पाहणीत सरकारच्या घोषणेतील फोलपणा उघड
कोपरगाव, दि. ५ नोव्हेंबर २०१५:
राज्य सरकारने १०० रुपये किलो दराने तूर डाळ विक्री करण्यासंदर्भात केलेली घोषणा फसवी असून, आज कोपरगाव येथे तूर डाळीचा भाव १८० रूपये असल्याचे  विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
विखे पाटील यांनी सरकारने केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील किराणा मालाच्या दुकानात प्रत्यक्ष भेट देवून डाळीच्या भावाची विचारपूस केली. दबावाखाली असलेले व्यापारी डाळीच्या भावातील कोणतीही सत्यता स्पष्टपणे सांगू शकले नाहीत. एकूणच राज्य शासनाने तूर डाळीच्या भावाबाबत केलेली घोषणा फसवी आणि दिशाभूल करणारी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर व्यक्त केली.
राज्य सरकारने वारंवार आश्वासने दिल्यानंतरही डाळींचे भाव कमी झालेले नाहीत. सरकारच्या घोषणेनंतरही डाळींच्या किमती पूर्वपदावर आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी  मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना दिवाळी निमित्त डाळींचे गिफ्ट बॉक्स देण्याची घोषणा करून सरकारचा प्रतिकात्मक निषेध करण्याचे ठरविले होते. विरोधी पक्षनेत्यांची आक्रमता लक्षात घेवून अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी तडकाफडकी निर्णय घेवून १०० किलो दराने ग्राहकांना डाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.
गुरुवारी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमधून डाळींच्या भावांची माहिती घेतली. सरकारच्या घोषणेनंतरही तूर डाळ १८० रुपये, उडीद डाळ १६० रुपये, मूग डाळ १३० रुपये असल्याचे निदर्शनास आले. 
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, सरकार फक्त सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करीत आहे. सरकारच्या घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, हेच या माध्यमातून उघड झाले. सरकारने साठेबाजांवर कारवाई करण्याचा केवळ फार्स केला. जप्त केलेली डाळ सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करून देण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केलेली होती. पण याबाबत निर्णय न करता जप्त केलेली डाळ व्यापारांना विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेऊन शासनाने एकप्रकारे त्यांना पाठीशीच घालण्याचा प्रयत्न केला आहे. व्यापारांवरही भावाबाबत दबाव असल्याची शंका विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केली.   
 

No comments:

Post a Comment