२७ नोव्हेंबर: अवयवदान दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम
सकाळी ०९.३० वाजता पोलीसांसाठी विशेष कार्यक्रम
दुपारी ०१.०० वाजता केईएम रुग्णालयात वैद्यकीय व्यवसायीकांसाठी विशेष कार्यशाळा
२७ नोव्हेंबर, २०१५ रोजीच्या राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे महापालिका क्षेत्रात विशेष जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये पहिला कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे होणार आहे. या कार्यक्रमात अवयवदान प्रक्रियेमध्ये पोलीसांची भूमिका यावर के.ई.एम. (रा.ए.स्मा.)रुग्णालयाच्या डॉ. श्रीमती कामाक्षी भाटे व डॉ. श्रीमती सुजाता पटवर्धन या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर वैद्यकीय व्यवसायीकांसाठी असणारा दुसरा कार्यक्रम दुपारी ०१.०० वाजता परळ परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात होणार आहे. 'ब्रेन डेड' झालेल्या व्यक्तीचा हात, दुस-या व्यक्तीच्या तुटलेल्या हातावर प्रत्यारोपण (ट्रान्सप्लांट) करण्याची अत्यंत कठीण अशी सूक्ष्म शस्त्रक्रिया (मायक्रो सर्जरी) करणारे केरळ मधील कोची येथील डॉ. सुब्रमण्यम अय्यर हे या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
वरील व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील काही महाविद्यालयांमध्ये देखील जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच ज्या व्यक्तींना अवयव दानासाठी `दाता' म्हणून नोंदणी करायची असेल त्यांच्यासाठी महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दाता नोंदणी करता येणार आहे.याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे :
- अवयवदान नोंदणी पध्दती : आपल्या मृत्यू नंतर आपल्या शरीरातील अवयवांचा सकारात्मक उपयोग व्हावा यासाठी अवयव दाता म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी व सुटसुटीत असून यासाठी केवळ एक पानी अर्ज भरुन द्यावा लागतो.या अर्जामध्ये आपले नाव, पत्ता, वय यासारख्री अत्यंत प्राथमिक माहिती नमूद करावी लागते. तसेच या अर्जावर अर्जदाराची व त्याच्या जवळच्या एका नातेवाईकाची स्वाक्षरी (सही) असणे आवश्यक असते.हा अर्ज भरुन झाल्यावर तो महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील संबंधित कक्षाकडे जमा करणे आवश्यक आहे. याबाबतच्या संपर्कासाठीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१. परळ येथे असणा-या रा.ए.स्मा. (के.इ.एम.) रुग्णालयातील'युरॉलॉजी' विभाग
२. मुंबई सेंट्रल परिसरातील बा.य.ल. नायर रुग्णालयातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता (एम.एस.डब्ल्यू.)
३. महापालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या परिसरात असणा-या संबंधित केंद्राच्या कार्यालयात जमा करता येऊ शकतो. त्यासाठीचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे : झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डीनेशन सेंटर (ZTCC), एल.टी.एम.जी. हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल) कॉलेज बिल्डिंग, १ ला मजला, रु. नं. २९, स्किन बँकेजवळ,सायन (पश्चिम) मुंबई - ४०००२२. दूरध्वनी क्रमांक: २४०२८१९७
- अवयव दान व दाता नोंदणीची माहिती www.ztccmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment