नामनिर्देशन सर्वेक्षणामध्ये कोणतीही आरक्षणे प्रस्तावित नाहीत !
प्रारूप विकास आराखडा नामनिर्देशन सर्वेक्षणाबाबत महापालिकेचे स्पष्टीकरण
बृहन्मुंबई महापालिकेद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्तावित 'प्रारूप विकास नियोजन आराखडा २०१४ - २०३४' याबाबत महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे संपूर्ण महापालिका क्षेत्रात नामनिर्देशन सर्वेक्षण (Designation Survey)करण्यात आले आहे. या ‘नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५’ बाबतची यादी व संबंधित माहिती महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, या माहिती आधारे विविध वृत्तपत्रातून प्रकाशीत झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने महापालिकेद्वारे स्पष्टीकरण देण्यात येत आहे की, सदर यादीमध्ये कोणतीही आरक्षणे प्रस्तावित केलेली नसून फक्त दिनांक २५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित केलेल्या २०१४ – २०३४ च्या प्रारुप विकास आराखडयातील चुकीच्या नामनिर्देशनांची दुरुस्ती प्रस्ताविण्यात आलेली आहे. तसेच सदर यादीबाबत नागरिकांची निरीक्षणे (Observations) देखील आमंत्रित करण्यात आली आहेत.
याबाबतची माहिती खालीलनुसार आहे :
- महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या ‘नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५’ च्या यादीमध्ये कोणतीही आरक्षणे प्रस्तावित केलेली नसून फक्त दिनांक २५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित केलेल्या२०१४ - २०३४' च्या प्रारुप विकास आराखडयातील चुकीच्या नामनिर्देशनांची दुरुस्ती प्रस्ताविण्यात आलेली आहे. उदा. जहांगीर आर्ट गॅलरीच्या ऐवजी चुकून गुरांचे इस्पितळ असे नामनिर्देशन नमूद करण्यात आले होते, ती चूक दुरुस्त करण्याचे प्रस्ताविले आहे. या त-हेने ‘नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५’ मध्ये नामनिर्देशनातील इतर चुकांची दुरुस्ती प्रस्ताविण्यात आली आहे.
- नामनिर्देशने ही वेगवेगळया रंगांमध्ये व काळया तीरप्या रेषांनी विकास आराखडयात दर्शविण्यात येतात. तर काही प्रसिध्द ठिकाणांची नांवे काळया अक्षरामध्ये विकास आराखडयात दर्शविण्यात येतात.प्रसिध्द ठिकाणांची नांवे आणि नामनिर्देशने या विकास आराखडयातील दोन भिन्न बाबी आहेत. बरीच प्रसिध्द धार्मिक स्थळे ही १९९१ च्या मंजूर सुधारीत विकास आराखडयामध्ये नामनिर्देशित केलेली नसून निव्वळ त्यांची नांवे दर्शविण्यात आलेली आहेत व जर दुरुस्तीची आवश्यकता नसेल तर ती कायम ठेवण्यात येतील आणि अंतिम विकास आराखडयामध्ये दर्शविण्यात येतील.
- सर्व पुरातन वारसा जतन वास्तू हया विकास आराखडयामध्ये न दर्शविता त्यांची यादी अंतिम विकास आराखडयास जोडण्यात येईल.
- निवासी, वाणिज्य किंवा औद्योगिक पट्टे जरी विकास आराखडयात दर्शविलेले असले, तरी त्या पट्टयांमध्ये समाविष्ट केलेली जागा म्हणजे ती जागा आरक्षित केली असे होत नाही. ही चूक नव्हे. सभोवतालचा पट्टा व जमिनीचा वापर हयांच्या मध्ये गल्लत करुन गैरसमज पसरविले जात आहेत. हया दोन भिन्न बाबी आहेत. नागरिकांनी याबाबत गैरसमजूत करुन घेऊ नये. प्रत्येक जमिनीचा भूभाग हा कोणत्या ना कोणत्या तरी पट्टयामध्ये समाविष्ट असतोच व आरक्षणे,नामनिर्देशने तसेच रस्ते यांचे क्षेत्रफळ देखिल सभोवतालच्या पट्टयात समाविष्ट असते.
- शासनाने दिलेल्या निदेशानुसार प्रारुप विकास आराखडा २०१४ - २०३४च्या दुरुस्तीमधील नामनिर्देशन सर्वेक्षण हा एक अंतरिम टप्पा आहे.प्रारुप विकास आराखडा २०१४ - २०३४ चा सुधारित मसूदा हा कालांतराने सर्व टप्पे पार पाडल्यानंतर महापालिकेच्या मान्यतेने जाहिर करण्यात येईल. सद्यस्थितीत पारदर्शकता व सर्वांना या प्रक्रियेमध्ये सामिल करण्याच्या उद्देशाने टप्पे निहाय कार्यवाही प्रस्ताविलेली आहे.
- 'प्रस्तावित प्रारुप विकास नियोजन आराखडा २०१४ – २०३४' आणि संबंधित नामनिर्देशन सर्वेक्षण ही तांत्रिक बाब असून याबाबत गैरसमज पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे.
- नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५ बाबत सूचना व हरकती नव्हे, तर निरिक्षणांची नोंद ee.dpr.mcgm@gmail.com या ई-मेलवर किंवा प्रमुख अभियंता (विकास नियोजन) यांचे कार्यालयास ‘नामनिर्देशन सर्वेक्षण ऑक्टोबर २०१५’ या विषयाच्या उल्लेखासहीत पाठविण्याचे आवाहन महापालिकेद्वारे यापूर्वीच करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment