Tuesday, 24 November 2015

रतलामचा विजय मोदी सरकारविरोधात जनमताचा एक कौल: खा. अशोक चव्हाण

रतलामचा विजय मोदी सरकारविरोधात जनमताचा एक कौल: खा. अशोक चव्हाण
मुंबई, दि. 24 नोव्हेंबर 2015:
मध्य प्रदेशातील रतलाम लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री कांतिलाल भुरिया यांनी 88 हजार मतांनी मिळविलेला मोठा विजय मोदी सरकारविरोधातील जनमताचा आणखी एक कौल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या निवडणुकीच्या निकालासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेशसारख्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात झालेला भाजपचा हा पराभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी नक्कीच उत्साहवर्धक आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत रतलामला भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली व भाजपने दिवंगत खासदाराच्या कन्येला उमेदवारी दिली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. परंतु, सहानुभूती किंवा मोदी-चौहान यांचा कोणताही करिश्मा या ठिकाणी दिसून आला नाही. भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यापासून सातत्याने केवळ मूठभर लोकांच्याच हिताचा विचार केला आणि सर्वसामान्य जनतेला वा-यावर सोडले. देशातील सौहार्दाच्या वातावरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भाजप सरकारच्या धोरणांबाबत जनतेने मतपेटीतून आपला असंतोष व्यक्त केल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

No comments:

Post a Comment