असहिष्णू वातावरणासंदर्भात पंतप्रधानांनी मौन सोडावे!
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे विधान
नाशिक, दि. 24 नोव्हेंबर 2015:
मागील काही काळात भारतातील वातावरण कलुषित झाले आहे, याबाबत दूमतच नाही. पंतप्रधानांनी मौन बाळगल्यामुळे हा मुद्दा दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत असून, आता त्यांनी मौन सोडावे आणि देशातील कलावंत-साहित्यिकांना भीती का वाटतेय; ते समजून घ्यावे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
आमिर खानच्या वक्तव्यासंदर्भात नाशिक येथे आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले की, देशातील वातावरण दहशतीचे होऊ लागले आहे; इथवर आमिर खानचे म्हणणे चुकीचे नाही. त्यामुळेच अनेक साहित्यिकांनी व कलावंतांनी शासकीय पुरस्कार परत केले आहेत. देशातील काही घटक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या समाज विघातक कारवाया सुरू आहेत. पंतप्रधानांनी यासंदर्भात तोंडात मिठाची गुळणी धरल्याने अशा मूठभर घटकांना जणू चिथावणीच मिळते आहे. मात्र, या देशातील बहुतांश जनता सहिष्णू व धर्मनिरपेक्ष असून, या घटकांना जनता योग्यवेळी धडा शिकवेल. त्यामुळे देश सोडून जाण्यासंदर्भात आमिर खानचे विधान अतिरेक असून, त्याऐवजी वर्तमान परिस्थितीत सर्वांनी सामूहिक व खंबीरपणे संघर्ष करण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment