Tuesday, 24 November 2015

‘पेंटाव्हॅलंट लस’ महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध

पेंटाव्हॅलंट लस महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपलब्ध

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांसाठी नव्याने  पेंटाव्हॅलंट लस सुरु करण्यात आली असून ही लस महापालिकेचे सर्व रुग्णालय तसेच दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध असून नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
पेंटाव्हॅलंट लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री श्री. दीपक सावंत यांच्याहस्ते नुकताच पार पडला आहे. बालकांना पेंटाव्हॅलंट लस दिल्याने घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हिपॅटायटिस बी, हिमोफिलस इन्फल्यूएंझी टाईप बी या आजारांपासून संरक्षण मिळते . या लसीचे तीन डोस अनुक्रमे दीड महिना, अडीच महिने आणि साडेतीन महिने या वयात देण्यात येतात. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते १ वर्ष वयोगटातील बालकांना नियमित लसीकरण कार्यक्रमातंर्गत ही लस देण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महापालिका आरोग्य केंद्र, दवाखाने व रुग्णालये या ठिकाणी नियमित लसीकरण कार्यक्रमातंर्गत पेंटाव्हॅलंट लस मोफत देण्यात येईल. आपल्या १ वर्षाखालील बालकांना पेंटाव्हॅलंट लस देऊन आपल्या बालकांच्या आरोग्याचे पाच आजारांपासून संरक्षण करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment