2 फेब्रुवारीला औरंगाबादेत साजरी होणार मनरेगाची दशकपूर्ती
भारतातील महत्वाकांक्षी योजनांपैकी एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाली होती आणि येत्या 2 तारखेला त्या घटनेला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. या माध्यमातून सर्वसामान्य गरीब माणसाला रोजगारही मिळाला आणि ग्रामीण भागात विकास कामेही झाली. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेची दशकपूर्ती साजरी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 2 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 2 वाजता संत एकनाथ रंगमंदीर, सिडको, औरंगाबाद येथे राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रामध्ये काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती व निमंत्रित पदाधिकारी सहभागी होतील. या चर्चासत्राच्या माध्यमातून सदरहू योजनेच्या सद्यस्थितीवर चर्चा केली जाईल. योजनेची उपयुक्ततात वाढविण्यासाठी काही शिफारसी केल्या जातील. केंद्रात सत्तांतर झाल्यानंतर या योजनेवरील खर्च कमी झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. योजनेची व्यापकता कमी करण्याची चर्चा सुरू आहे. अशा विविध मुद्यांवर करून त्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेला आ. भाई जगताप, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस यशवंत हाप्पे, प्रवक्ते हरिश रोग्ये, डॉ. राजू वाघमारे, अल नासिर झकेरिया आदी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment