वांद्रे पश्चिम परिसरातील नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू
पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी राहूल नगर नाल्याचे रुंदीकरण
बृहन्मुंबई महापालिकेच्या एच/पश्चिम विभागातील राहुल नगर परिसरात असणा-या नाल्यातील अतिक्रमणांमुळे गेल्या पावसाळ्यात अलियावर जंग मार्ग, कृष्ण चंद्र मार्ग, लिलावती रुग्णालय आदी परिसरांमध्ये पाणी साचल्याचे लक्षात आले होते. हि बाब लक्षात घेऊन ह्या नाल्यातील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही महापालिकेद्वारे सुरु करण्यात आली आहे.मुंबई पोलीसांच्या सहकार्याने सुरु असलेल्या या कार्यवाही दरम्यान आतापर्यंत सुमारे ७० अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
वांद्रे (पश्चिम) भागातील राहुल नगर परिसरातील हा नाला 'राहुल नगर नाला' या नावानेच ओळखला जातो. म्हाडाच्या भूभागातून काही अंतर जाणा-या या नाल्यामध्ये गेल्या काही वर्षात १२५ अनाधिकृत बांधकामे उभी राहिली होती. या बांधकामांमुळे व अतिक्रमित स्वरुपाच्या 'काँक्रीटायझेशन'मुळे नाल्याच्या प्रवाहास अडथळा होऊन पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे हि अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही महापालिकेद्वारे हाती घेण्यात आली आहे. हि कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मुंबई पोलीसांनी तत्परतेने सकारात्मक सहकार्य केले आहे. या सर्व कार्यवाहीचे समन्वयन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंता राजेश यादव, दुय्यम अभियंता(Sub Engineer) दिनेश भोसले, कनिष्ठ अभियंता अमित पोवार, विक्रांत मणियार व सुशांत बागल हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment