भाजपची आरक्षणविरोधी भूमिका पुन्हा उघड!: सचिन सावंत यांचा आरोप
ओबीसी आरक्षणाचे समर्थन करणारे भाजप खासदार नाना पटोले यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिल्याने भाजपची आरक्षणविरोधी भूमिका पुन्हा उघड झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
खा. पटोले यांना आरक्षणाचे समर्थन केल्याबद्दल पक्षाने नोटीस दिल्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर वाद उभा झाल्यामुळे संघ व भाजप दोघांनीही आपण आरक्षण विरोधात नसल्याचे दावे केले होते. परंतु, खा. नाना पटोले यांना भाजपने दिलेल्या कारणे दाखवा नोटीसवरून भाजपची आरक्षणविरोधी मूळ भूमिका पुन्हा एकदा समोर आल्याचे सावंत यांनी सांगितले.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ असताना औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा झाल्याबद्दल सचिन सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवसेनेच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे वारंवार दिसून आले आहे. त्यामुळेच त्यांना कधी जागेसाठी, तर कधी स्मारकासाठी, तर कधी अखंड ज्योतीच्या निधीसाठी सरकारकडे धाव घ्यावी लागते. त्याऐवजी शिवसेनेने चंद्रकांत खैरेंसारख्या नेत्यांचे खिसे उलटे केले तर लाखो रुपये मिळाले असते. एकीकडे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या नावाखाली छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून प्रसिध्दी मिळवतात; तर दुसरीकडे शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंसारखे नेते ऐन दुष्काळात लग्न सोहळ्यावर कोट्यवधी रुपये उधळतात, ही बाब विसंगत आहे. मराठी माणसाच्या नावाखाली शिवसेना नेत्यांनी स्वतःचाच विकास केला. प्रत्यक्षात त्यांना मराठी माणसाशी काहीही घेणे-देणे नाही. मराठी माणूस किंवा शेतकऱ्यांबद्दल आस्था असती तर मराठवाड्यातील गरीब मराठी शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करीत असताना त्याच मराठवाड्यातील शिवसेना नेत्यांनी लग्न सोहळ्यांवर अशी उधळपट्टी केली नसती, असे सावंत म्हणाले.
मध्य प्रदेशातील सतनाचे भाजप खासदार गणेश सिंह यांनी नववर्षाच्या पहाटे सिद्धिविनायक मंदिरात घातलेल्या गोंधळाची वस्तूस्थिती समोर यावी, यासाठी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही फुटेजची आज पोलिसांकडे औपचारिकपणे मागणी केल्याची माहिती याप्रसंगी सावंत यांनी दिली.
No comments:
Post a Comment