देवनार डंपींग ग्राऊंड येथील आग नियंत्रणात
अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत
देवनार क्षेपणभूमी (डंपींग ग्राऊंड) येथे लागलेली आग आटोक्यात यावी,यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा गेले दोन दिवस अथक व सर्वस्तरीय प्रयत्न कसोशीने करत असून सदर आग नियंत्रणात येत आहे. आगीची तीव्रता मोठी नसली तरी हवेच्या गतीमुळे सदर आग कच-यात धुमसत असल्याने धूर वातावरणात पसरत आहे. देवनार क्षेपणभूमी येथे धुमसत असलेली आग पूर्णपणेनियंत्रणात यावी, यासाठी यासाठी घटनास्थळी १४ फायर इंजिन, ८ पाण्याचे टँकर्स, अग्निशमन विषयक अत्याधुनिक यंत्रसामुग्री यासह अग्निशमन दलाचे २१ अधिकारी व १३२ जवान घटनास्थळी कार्यरत आहेत. तसेच सदर आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी २ `मिनी वॉटर टेण्डर' देखील वापरण्यात येत आहे. विशेष म्हणजे आग लवकर विझवण्यासाठी `जेट कूल सोल्यूशन' मिनी वॉटर टेण्डर मधील पाण्यामध्ये मिसळवून प्रथमच वापरण्यात येत आहे.
या धूराचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तोंड व नाक झाकले जाईल अशा पध्दतीने ओला रुमाल बांधावा,तसेच काळा चष्मा देखील वापरावा, अशी सूचना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त श्री. प्रकाश पाटील, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी असून महापालिका आयुक्त श्री. अजोय मेहता हे या सर्व अधिका-यांच्या संपर्कात आहेत. तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. संजय देशमुख हे स्वत:महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सर्व परिस्थितीबाबत यथायोग्य समन्वया ची कार्यवाही करीत आहेत.
घटनास्थळी कार्यरत असणा-या मुंबई अग्निशमन दल यंत्रणेबाबत थोडक्यात माहिती
- १४ फायर इंजिन : प्रत्येकी ४,५०० लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे १४ फायर इंजिन्स
- ८ वॉटर टँकर्स : १२ ते १८ हजार लीटर्स एवढी पाणी साठवण क्षमता असणारे ८ वॉटर टँकर्स
- २ आपत्कालीन रुग्णवाहिका : डॉक्टर्स व संबंधित चमूसह २ अद्ययावत आपत्कालीन रुग्णवाहिका
- १ अतिरिक्त रुग्णवाहिका : १ सर्वसाधारण अतिरिक्त रुग्णवाहिका
- १ कंट्रोल पोस्ट : सर्व अग्निशमन विषयक बाबींचे सुयोग्य समन्वयन करण्यासाठी घटनास्थळी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह व संवाद यंत्रणेसह सुसज्ज असणा-या एका अद्ययावत वाहनामध्ये अतिरिक्त व विशेष नियंत्रण कक्ष कार्यरत
- श्वसन उपकरण वाहन : घटनास्थळी कार्यरत असणा-या अग्निशमन दलाच्या जवानांना आवश्यकता भासल्यास तातडीने श्वसन उपकरण (Breathing Apparatus) उपलब्ध देण्यासाठी श्वसन उपकरण वाहन तैनात. या एका वाहनामध्ये श्वसन उपकरणांचे २२ संच उपलब्ध
- २ मिनी वॉटर टेण्डर : कच-यामध्ये खोलवर असलेली आग विझवण्यासाठी अधिक वेगाने पाण्याची फवारणी करण्यासाठी मिनी वॉटर टेण्डरचा वापर केला जातो. प्रत्येकी १ हजार लीटर्स पाणी साठवण क्षमता असणारे २ मिनी वॉटर टेण्डर घटनास्थळी कार्यरत
- जेट कूल सोल्यूशन : आग लवकर नियंत्रणात यावी यासाठी मिनी वॉटर टेण्डरमधील पाण्यामध्ये १५० लीटर्स एवढे `जेट कूल सोल्यूशन' मिसळविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या सोल्यूशनचा वापर मुंबई अग्निशमन दलाद्वारे प्रथमच करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment