मराठा आरक्षणासाठी नवी दिल्लीत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची विखे पाटील यांनी घेतली भेट
आंदोलन मागे घेण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. १८ जानेवारी २०१६:
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दुपारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जंतरमंतरवर बेमुदत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असून, विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
नवी दिल्ली येथे शुक्रवारपासून महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीतर्फे जंतरमंतरवर मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. आज दुपारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना उपोषणकर्त्या विद्यार्थांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दिल्लीतील कडाक्याची थंडी व उपोषणामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असून, शिवराज कोळसे पाटील नामक आंदोलकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलकांची भूमिका योग्य असून, त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करू. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव आणू. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सक्षम वकील नियुक्त करण्यासाठी सरकारला भाग पाडू. तोवर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष अविनाश खापे पाटील, सुशील काळे, शुभम राखुंडे, सतीश झिरपे, संकेत हरवले, वैभव मोरे, मुन्ना पाटील आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment