Saturday, 30 January 2016

प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे आणि भाडेकरूंना मालकी हक्क द्या - संजय निरुपम…

प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे आणि भाडेकरूंना मालकी हक्क द्या - संजय निरुपम… 
भाजपा सरकारने प्रस्तावित भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द केला पाहिजे. तात्पुरती स्थगिती नको आहे. ही तात्पुरती स्थगिती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपाने केली आहे. निवडणुका झाल्यावर हा कायदा पुन्हा हे सरकार लागू करणार. म्हणून काँग्रेसची अशी मागणी आहे की हा भाडे नियंत्रण कायदा कायमचा रद्द झाला पाहिजे. भाडेकरू व चाळकऱ्यांना कायमचा दिलासा मिळाला पाहिजे. तसेच भाजपा सरकारने या भाडेकरूंना त्या जागेचा मालकी हक्क मिळण्याच्या दृष्टीने ताबडतोब पाऊले उचलली पाहिजे व हे सगळे सरकारने महानगरपालिकेच्या निवडणुका होण्याच्या आधीच केले पाहिजे. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम पत्रकार परिषदेत म्हणाले. 
ते पुढे म्हणाले कीया चाळकरी व भाडेकरूंना सरकारने हा कायदा रद्द झाल्याबाबत व मालकी हक्काबाबत लिखित स्वरुपात करार करून दिला पाहिजे. तेव्हाच या सगळ्या भाडेकरूंना कायमचा दिलासा मिळेल. असे झाल्यावरच काँग्रेसचे आंदोलन व ही चळवळ संपेल. 
संजय निरुपम म्हणाले की भाजपा सरकारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजमीनमालक व बिल्डर यांचे हे खूप मोठे षड्यंत्र आहे की दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागा बळकावायच्या. या षड्यंत्रामागे भाजपाचा आमदारजो एक खूप मोठा बिल्डरदेखील आहे. तो म्हणजे मंगलप्रभात लोढा आहे. त्याचेच हे सगळे कारस्थान आहे. दक्षिण मुंबईतून चाळकरी व भाडेकरूंना हाकलून लावण्याचा भाजपा सरकारचा मोठा डाव आहे. पण काँग्रेस हे कधीही होऊ देणार नाही. सर्व भाडेकरूंच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. त्यासाठी काँग्रेस सर्व भाडेकारुंमध्ये जागरूकता निर्माण करणार आहे. चौका-चौकांत फलक लाऊन सतर्क राहण्याचे आवाहन करणार आहे. भाडेकरूंना शिक्षित करणार आहे. 
ते पुढे म्हणाले की काँग्रेस सर्व भाडेकरूंना व कार्यकर्त्यांना घेऊन प्रचंड मोर्चा रविवारी काढणार होती. रस्त्यावर उतरणार होती. त्यालाच घाबरून सरकारने या कायद्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. हे कॉंग्रेसचे यश आहे. 
या पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह माजी खासदार मिलिंद देवरा,आमदार अमीन पटेल व वीरेन शाह तसेच सर्व भाडेकरू संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment