लघुपट-माहितीपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ एक सशक्त व्यासपीठ; गुणवत्ता राखण्याचे निर्मात्यांना आवाहन – माईक पांडे
३० जानेवारी,२०१६
लघुपटांच्या प्रदर्शनासाठी मिफ्फ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एक सशक्त व्यासपीठ असल्याचे आयडीपीए अर्थात भारतीय माहितीपट निर्माता संघटनेचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सांगितले. मुंबईत मिफ्फ मिडिया सेंटर इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. माहितीपट क्षेत्राला अतिशय कठीण आणि प्रदिर्घ कालावधीसाठी संघर्ष करावा लागला. मात्र आता या परिस्थितीत स्वागतार्ह बदल होत असून अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्धता यामुळे कित्येकांना माहितीपट बनविणे शक्य होत आहे असे पांडे यांनी नमूद केले.
आयडीपीए आणि दूरदर्शन यांच्यात तीन वर्षांसाठी झालेल्या करारानुसार डीडी नॅशनल वाहिनीवर आजपासून माहितीपट दाखविण्यास सुरुवात झाली आहे. माहितीपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने तसेच जास्तीतजास्त लोकांपर्यंत माहितीपट पोहचवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यांत आला आहे. दर शनिवारी दुपारी अडीच वाजता अर्धा तास दर्जेदार लघुपट, माहितीपट दाखविले जाणार आहेत. या कराराअंतर्गत माहितीपट निर्मात्याला भरघोस मानधन दिले जाणार आहे. माहितीपट क्षेत्राच्या विकासासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचे पांडे म्हणाले.
आर्थिक प्राप्तिच्या उद्देशाने माहितीपट बनविण्यापेक्षा दर्जेदार कथानक आणि निर्मितीवर भर दिला पाहिजे असे आवाहन पांडे यानी माहितीपट निर्मात्यांना यावेळी केले. दर्जेदार माहितीपट कलाकृतीना आर्थिक तसेच प्रसिध्दी यासंदर्भात सहकार्य करण्यांसाठी आयडीपीए सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही पांडे यांनी यावेळी दिली.
पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणासंदर्भात बोलताना पांडे म्हणाले की मानवाला आयुष्य जगण्यांसाठी सुरक्षित स्वच्छ पर्यावरणाची आवश्यकता आहे आणि ही गरज पूर्ण करण्यांसाठी लोकांना जागृत केले पाहिजे, यासाठी माहितीपट हे एक उत्तम माध्यम असल्याचे पांडे यांनी नमूद केले. दरम्यान माहितीपटांच्या निर्मितीसाठी कोर्पोरेट क्षेत्रांने सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत आर्थिक पाठबळ देण्यांसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment